औरंगाबाद : एक काळ होता जेव्हा काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सत्तेत यायची. तेव्हा काँग्रेसचे नेते आम्हाला चिडवायचे. देशात सत्ता करणार कोण ज्यांचे खासदार दिल्लीत दोन. अशी खिल्ली ते तेव्हा आमची उडवायचे. आता मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश मजबुतीने पुढे जात आहे. आमची खिल्ली उडवणाऱ्या कोंग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हायला आज कुणी तयार नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशात सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत आज सिडको परिसरातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात शहरातील सदस्य नोंदणीचा प्रारंभ केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पदाधिकार्यांनी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात २ लाख सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
केंद्रात दुसर्यांदा सत्तेत आलेल्या भाजपने आता महाराष्ट्रात पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी तसेच पक्ष संघटन वाढवण्याकरिता जोरदार तयारी सुरू केली आहे. या दृष्टीने संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले आहे. देशात व राज्यात सदस्य नोंदणीचा प्रारंभ केल्यानंतर आज रविवारी शहरातील सदस्य नोंदणीचा प्रारंभ सिडको परिसरातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, म्हाडाच्या विभागीय समितीचे अध्यक्ष संजय केणेेकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, बसवराज मंगरूळे, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी, महिला शहराध्यक्ष माधुरी अदवंत, माजी महापौर बापू घडामोडे, नगरसेवक राजू शिंदे आदींची उपस्थिती होती.
शहरात गेल्या वेळी सुमारे 1 लाख सदस्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापेक्षा दुपटीने सदस्य नोंदणी या अभियानांतर्गत करण्यात येणार असून, त्याकरिता प्रत्येक बुथवर किमान 300 सदस्य नोंदणी करण्याचे पक्षाने निर्धारित केले आहे. याकरिता मंडळनिहाय बैठका घेण्यात आल्याचे पदाधिकार्यांनी यावेळी सांगितले.
पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नका ...
चंद्रकांत खैरे माझे चांगले मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रभावाने ते थोडे निराश झाले आहेत. त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रयेक मतदारसंघात उमेदवार उभे नव्हते तर मोदी उभे होते. लोकांनी मोदींना बघून मतदान केले. त्यामुळे खैरे यांचा पराभव भाजपामुळे झाला असे म्हणने योग्य नाही असे दानवे आपल्या भाषणात म्हणाले.











